२०१००८११

एककाधारित अर्थव्यवस्था

एककाधारित अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर, याआधी वर्णन केलेल्या स्वयंपूर्ण भूखंडासारख्या भूखंडांना, एक, एक स्वतंत्र आर्थिक एकके समजून, त्यांचे स्थानिक नियोजनावर आधारलेली अर्थव्यवस्था.

हल्लीच्या एकत्रित उत्पादन (mass production) पद्धतीत, उद्‍भवणार्‍या एकत्रिकरण, साठवण, स्थानांतरण, वितरण इत्यादी समस्यांमुळे ग्राहकोपयोगी वस्तुंच्या वास्तव किंमतीत अनेक पटींनी नको ती भर घातली जाते. जिथे वापरायची तिथेच, आणि जेवढी वापरायची तेवढीच जर प्रत्येक गोष्ट निर्माण केली गेली तर वायफळ खर्च नामशेष होऊन, मानवी प्रयत्नांच्या सृजनात्मक गुंतवणूकीस वांछित महत्त्व प्राप्त होऊ शकते. तसेच माणसे आणि वस्तूंचे स्थानांतरण, वस्तूंचा परस्पर विनिमय आणि नको असलेल्या वस्तूंचा हव्यास, हे सर्व योग्य त्या प्रमाणात बसवले जाऊ शकते. त्यासंबंधित उद्योगांत निष्कारण गुंतलेले मानवी प्रयत्न सृजनात्मक कामांकडे वर्ग करता येणे शक्य होते.

भारतीय संस्कृतीत ’अपरिग्रह’ म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अनावश्यक साठा न करणे, ही गोष्ट कायमच शिकवण्यात आलेली आहे. कमीत कमी संसाधनांचा वापर करून, जीवन कसे जास्तीत जास्त समृद्ध बनवता येईल; याकडे मात्र पुरेसे लक्ष राहिलेले नाही. त्यामुळे ग्राहकानुनयावर आधारित नव्या पाश्चात्य विचारसरणीचा अमिट प्रभाव आपल्या जीवनशैलीवर पडलेला दिसून येत आहे.

अशा परिस्थितीत, चार माणसांच्या एका कुटुंबाचे एक एकक गृहित धरून, त्यावर आधारित अर्थव्यवस्थेचा नवा समाज संकल्पित करण्याची आवश्यकता आहे. असे केल्यास आपल्या पारंपारिक ग्रामजीवनास आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत बसवून नव्या आर्थिक एककास जन्म देणे शक्य होईल. मग त्या एककाधारित अर्थव्यवस्था प्रचारात आणून अनावश्यक खर्चांना नामशेष करता येऊ शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: