२०१००९०६

सौरशेती

शेती म्हणजे अन्नधान्याचीच असा आपला सगळ्यांचा ठाम समज झालेला आहे. त्याबरहुकूमच आपले सगळ्यांचे विचार चौकटीत राहिलेले दिसत आहेत. त्या चौकटीचा भंग करण्याकरता मी आता काही नवे लिहीतो.

दहा वर्षांपूर्वी सौर पटलांचा वापर करून तयार होणारी वीज ५० रुपये प्रती युनिट दराने तयार होई, तर मराविमं तेव्हा ५० पैसे प्रती युनिट दराने पारंपारिक वीज विकत असे. आज सौर वीज १५ रुपये प्रती युनिट पडते आहे तर मराविमं ५ रुपये प्रती युनिट दराने पारंपारिक वीज विकते आहे. आणखी ५ ते १० वर्षांत हा कल उलटा होणार आहे. हे नक्की.

आज चार जणांच्या एका कुटुंबास २,५०० वर्ग फुटावरील सौर पटले आवश्यक ती संपूर्ण वीज पुरवू शकतात. अर्ध्या एकरात संपूर्ण सौरशेती केल्यास छताखालील जागा इतर वापराकरता उपलब्ध राहून अन्य किमान आठ कुटुंबांना लागणारी वीज मराविमंला विकता येण्याजोगी आहे. असे केल्यास अन्य कुठलीही शेती न करताही कुटुंब पोषण सुखैनैव होऊ शकेल.

२०१००९०३

राष्ट्रीय नियोजनाचे उद्दिष्ट काय असावे?

अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी प्राथमिक गरजा; स्वातंत्र्य, सुरक्षितता, विहार/संचार सुलभता इत्यादी अनुषंगिक गरजा; आणि उद्यम, संस्कृती, कलाकौशल्ये यांच्या विकासास वाव देणारे संपन्न राहणीमान; या तिन्ही आवश्यकता देशातील सर्व माणसांना सहज उपलब्ध व्हाव्यात.

१५ ते ६० वयोगटातील माणसांना कर्तृत्वमान समजावे. या वयोगटातील माणसांना त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेनुरूप व्यवसाय मिळण्याचा आणि त्याला उचित अशा स्वरूपाचा मोबदला मिळवण्याचा हक्क असावा. त्यातूनच त्यांनी स्वतःची तसेच कुटुंबियांची उपजीविका चालवावी.

इतरांस दुर्बळ, वृद्ध, असहाय्य समजून, वरील आवश्यकता मोफत वा सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून मिळाव्यात. कर्तृत्वाची अपेक्षा न धरता उपजीविका उपलब्ध व्हावी.

राष्ट्रीय किमान राहणीमानाची संकल्पना तयार करून; देशांतर्गत नैसर्गिक संसाधने, स्थापित उद्यम आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा पुरेपूर उपयोग करून; किमान राहणीमानाच्या संकल्पनेबरहुकूम राहणीमान सगळ्यांना प्राप्त व्हावे; याकरता आवश्यक ते सर्व नियोजन भावी पंचवार्षिक कालावधीकरता करणे हे राष्ट्रीय उद्दिष्ट असावे.